मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ही संविधिक संस्था असून, तिची स्थापना दि.26 जानेवारी, 1975 रोजी झाली. या प्राधिकरणाच्या अधिकार कक्षेत 4,355 चौ. कि.मी. क्षेत्र येत असून, त्याच्या हद्दीत बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, मिरा-भाईंदर व वसई-विरार या 8 महानगरपालिका, 9 नगरपरिषदा व 1000 च्या वर खेडयांचा समावेश होतो.
प्राधिकरणाची सर्वसामान्य उद्दिष्टे :
मुंबई महानगर प्रदेशाचे एकूण क्षेत्र सुमारे 4,355 चौ. कि.मी. असून, यामध्ये मुंबई, मुंबई उपनगरे हे संपूर्ण जिल्हे व ठाणे व रायगड या अंशत: जिल्हयाचा समावेश आहे. या प्रदेशाच्या सीमा उत्तरेला तानसा नदी, दक्षिणेला पातळगंगा नदी आणि पेण व अलिबाग तालुक्यातील गावे, पूर्वेला कल्याण व भिवंडीची पूर्व सीमा आणि कर्जत तालुक्यातील सहयाद्रीच्या पायथ्याशी असलेल्या टेकडया अशा आहेत.
प्राधिकरण मुंबई महानगर प्रदेशासाठी प्रादेशिक योजना तयार करणे, प्रादेशिक महत्वाच्या प्रकल्पांचे नियोजन करणे व अंमलबजावणी करणे, त्यास अर्थसहाय्य देणे, स्थानिक प्राधिकरणाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मदत करणे, मुंबई महानगर प्रदेशातील विकासांच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधणे आणि प्रदेशावर विपरीत परिणाम होऊ शकेल अशा विकासास प्रतिबंध करणे, प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या व्यक्तींचे पुनर्वसन करणे या कार्याचा समावेश आहे. तसेच वांद्रे-कुर्ला संकुल, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर आणि परिसर क्षेत्र, ओशिवरे जिल्हा केंद्र, बॅक-बे रिक्लमेशन, वडाळा वाणिज्यिक केंद्र, गोराई-मनोरी-उत्तन अधिसूचित क्षेत्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून वगळण्यात आलेल्या 27 गावांसाठी व भिवंडी परिसरातील 51 गावांसाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 अन्वये हे प्राधिकरण “विशेष नियोजन प्राधिकरण” म्हणून कार्यरत आहे.
प्राधिकरण प्रादेशिक योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात खालील कार्य करीत आहे :-
- गोराई मनोरी-उत्तन या अधिसूचित क्षेत्राकरीता प्राधिकरणाने प्रारुप विकास आराखडा तयार केलेला आहे.
- आंतरराष्ट्रीय विमानतळ व महामुंबई ( एस.ई.झेड ) हे दोन प्रस्तावित प्रकल्प राबविण्यासाठी नियोजन करत आहेत.
- मुंबई महानगर प्रदेशातील नागरी पायाभूत सुविधांसाठी वित्त सहाय्य करणे.
- एकात्मिक ग्राम विकास योजनेला अर्थसहाय्य करणे.
- जागतिक बँकेच्या मदतीने हाती घेतलेल्या मुंबई नागरी विकास प्रकल्पाकरीता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण समन्वयाचे काम करते.
- मुंबई महानगर प्रदेशातील परिवहन व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन, भारतीय रेल्वे व प्राधिकरणातर्फे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ( एमयुटीपी ) राबवित आहे.
- रेल्वे पूल या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात येते.
- मुंबई मेट्रो रेल प्रकल्प राबवित आहे.
- मुंबई शहर हे प्रमुख आंतराराष्ट्रीय वित्तीय व व्यापार केंद्र म्हणून ख्यातीप्राप्त आहे. याकरीता विविध पायाभूत सुविधा पुरवून त्यांचा विकास करण्यात येत आहे.
- हे प्राधिकरण “मुंबई पार बंदर पूल” हा भारतातला सर्वात मोठा सागरी सेतू बांधण्याचा प्रकल्प राबवित आहे.
अधिक माहितीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) http://www.mmrda.maharashtra.gov.in/ संकेत स्थळावर भेट द्यावी.