नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावक्षेत्र (नैना)

-
महाराष्ट्र शासन अधिसूचना क्र.टिपीएस-1712/475/सी.आर.98/नवि-12 दि. 10 जानेवारी, 2013अन्वये नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्र (NAINA) च्या अधिसुचीत क्षेत्रासाठी शहर व औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र (सिडको) ची, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 च्या कलम 40(1) (ब) नुसार “विशेष नियोजन प्राधिकरण” म्हणून नेमणूक केली आहे.
-
महाराष्ट्र शासन अधिसूचना क्र.टिपीएस-1717/एमआयएस/2750/सी.आर -91/2019/नवि-12, दि. 16.09.2019 अन्वये नैना क्षेत्राचा विकास आराखडा मंजूर केलेला आहे. सदर विकास आराखडा नगर रचना परियोजना (टि.पी.एस.) च्या माध्यमातून विकसीत करण्याचा निर्णय सिडकोने घेतलेला आहे.
-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या २० किमी त्रिज्येतील सभोवतालच्या क्षेत्रात अनिर्बंध बांधकामांना आळा घालण्यासाठी आणि पर्यावरणपूरक, सर्व सुविधांनी सुसज्ज शहर उभारण्यासाठी सिडकोद्वारे राज्य शासनाच्या मान्यतेने नैना प्रकल्प राबविण्यात येत आहे. नैना प्रकल्पांतर्गत प्रगतिशील योजनांचा आणि विमानतळाच्या विकासाचा अंदाज घेतल्यावर, बहुतांश गुंतवणूकदार या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. सिडकोने या क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण करणे, शैक्षणिक व आरोग्यविषयक पायाभूत सुविधा वाढवणे आणि पर्यावरण-पर्यटन व मनोरंजनास चालना देणारे विकास प्रकल्प या गोष्टीवर भर देण्याचे ठरवले आहे.
-
स्थानिक जमिनधारकांचा समावेश व पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सिडकोने २०१९ मध्ये मान्यता मिळाल्यानंतर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात ४७ गावांसाठी नगररचना परियोजनांचा अवलंब करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ नुसार नगररचना परियोजना राबवल्या जात आहेत, ज्यामध्ये जमीनधारकांना सहभागी करून त्यांच्या अपेक्षांचे निराकरण आवश्यक आहे. अंतिम भूखंड “फ्रीहोल्ड” स्वरूपात दिले जात असून त्यावर विक्री किंवा विकासासाठी कोणत्याही कालावधीचे बंधन नाही.
-
नैना क्षेत्रात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या उद्देशाने सिडकोने पुढाकार घेतला असून यात ४५ मीटर रुंदीचे रस्ते, उड्डाणपूल, अंडरपास व सिग्नलरहित चौकांची आखणी त्याचप्रमाणे आरक्षित भूखंडांवर शाळा, खेळाची मैदाने व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नुकत्याच परिवहन सुविधा विकासासाठी साठी रु. ७००० कोटींच्या रस्त्यांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या आहे.
-
तसेच पाणी पुरवठा सुधारणा उद्देशाने कोंढाणे येथे नवीन धरण उभारले जाणार आहे, जेथून दररोज ३५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होईल. मेट्रो कनेक्टिव्हिटी बाबत सिडकोने सुरुवात केली असून नैनाला विमानतळ, नवी मुंबई आणि मुंबईशी जोडण्याचे नियोजन आहे.रस्ते व पूल यासारख्या सुविधा विकसित करण्यासाठी नामांकित कंपन्यांना कार्यादेश देण्यात आले आहे.
- नैनाच्या स्वतंत्र वेब पोर्टलवर या योजनांची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
-
पहिल्या टप्प्यात ४७ गावांसाठी १२ नगररचना परियोजना मंजूर असून त्यापैकी १ ते ७ योजनांसाठी शासनाची मंजुरी प्राप्त असून ८ ते १२ परियोजनांची लवाद प्रक्रिया सुरू आहे .
- रु. ७००० कोटी रस्त्यांच्या कामांसाठी निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत
- “फ्रीहोल्ड” भूखंडांवर कोणतेही कालबद्ध विकासाचे निर्बंध नाहीत.
- शाळा, रुग्णालये आणि खेळाच्या मैदानांसाठी आरक्षित भूखंड ठेवण्यात आले आहेत .
- कोंढाणे धरणाद्वारे पाणीपुरवठा सुधारणा.
- मेट्रोद्वारे विमानतळ, नवी मुंबई व मुंबईशी जोडणी.
https://cidco.maharashtra.gov.in/Page?Token=D4AAA8D3366#gsc.tab=0