Skip to main content

महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ ( CIDCO )

 

दिनांक 17 मार्च, 1970 रोजी महाराष्ट्र शासनाने शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, अर्थात सिडको लिमिटेडची स्थापना केली. मुंबई बेटाच्या पलिकडे मुख्य भूभागावर नवी मुंबई शहर बसविण्याचे काम शासनाने सिडकोकडे सुपूर्द केले. सिडको ही पूर्णपणे शासनाच्या मालकीची कंपनी असून, आज ही कंपनी महाराष्ट्र आणि भारताच्या विविध भागांमध्ये नगर नियोजन आणि पायाभूत सोयीसुविधा पुरविणारी अग्रगण्य संस्था म्हणून गणली जाते.  शहर निर्मिती करणारी संस्था म्हणून सिडको आज भारतामध्ये एक प्रमुख संस्था आहे. शहराचे नियोजन आणि मुलभूत आणि पायाभूत सोयीसुविधा पुरविणे ही या अनुषंगाने येणारी दोन प्रमुख कार्ये आहेत. शहर म्हटले की, शहराच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या भौतिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, करमणुक या आदी विषयांवरील सेवा सुविधा निर्माण करणे किंवा निर्माण करण्यासाठी नियोजन करणे किंवा या निर्मितीसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करणे हे सिडकोचे प्रमुख कार्य आहे.

शहरांच्या निर्मितीच्या अनुषंगाने सिडको नागरिकांसाठी विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरवित असते. त्यापैकी मुख्य सुविधा पुढीलप्रमाणे आहेत :-

  1. आधुनिक शहरासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी गरजांचा आणि मागणीचा आढावा घेऊन भविष्यात अशा प्रकारच्या सुविधांना होणारी मागणी लक्षात घेऊन शहराचे नियोजन करणे.
  2. नियोजन आराखडयानुसार नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी वरील प्रकारच्या विषयांवरील पायाभूत सोयीसुविधा निर्माण करणे अथवा त्या निर्मितीमध्ये सहाय्यभूत ठरणे.
  3. नागरिकांच्या निवाऱ्यासाठी गृहनिर्माण सेवासुविधा नियोजित करणे आणि पुरविणे. 
  4. नागरिकांच्या निवासी, वाणिज्यिक गरजा लक्षात घेऊन त्या संदर्भात गृहनिर्माणाची स्वत: मार्फत अन्यथा खाजगी संस्थांमार्फत व्यवस्था करणे.
  5. या सर्व सेवासुविधेंच्या वितरणासाठी मार्गदर्शक नियमावली तयार करणे आणि ती प्रसिध्द करणे.
  6. सदर नियमावली सर्वसाधारण जनतेला समजेल अशा भाषेमध्ये आणि सहजपणे उपलब्ध होईल, अशा पध्दतीने तिचे वितरण करणे.
  7. नागरिकांच्या सुविधेसाठी महामंडळाची कार्यप्रणाली, उद्दीष्टे, नियमावली, महत्वाच्या उपलब्धी, प्रकल्प या विषयीची सचित्र माहिती प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाव्दारे जनतेपर्यंत पोहोचविणे.
  8. सदर माहिती सिडकोच्या वेबसाईटव्दारे नागरिकांना उपलब्ध करुन देणे.
  9. मालमत्तेची विक्री, हस्तांतरण व इतर अनुषंगिक कायदेशीर बाबींची पुर्तता करण्याविषयीचा करारनामा, अर्ज नागरिकांना सहजपणे उपलब्ध करुन दिले जातात. तसेच ते सिडकोच्या वेबसाईटव्दारेही डाऊनलोड करता येतात.
  10. 12.5 टक्के नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनातर्फे आणि सिडकोतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनेची सविस्तर पुस्तिकेव्दारे माहिती उपलब्ध. 
  11. पुनर्वसनाविषयीच्या नोंदी संगणकाव्दारे उपलब्ध होतील, यासाठी नियोजित माहिती संगणकीकृत झाल्यानंतर ती नागरीकांना नागरी सुविधा केंद्रामार्फत उपलब्ध होणार.
  12. सिडकोच्या विविध योजनांची माहिती पुस्तिकाव्दारे नागरिकांसाठी उपलब्ध करुन देणे. 
  13. नागरिकांच्या सध्याच्या आणि भविष्याच्या गरजा लक्षात घेऊन मुलभूत, पायाभूत, सोयीसुविधांची आधुनिक तंत्राव्दारे निर्मिती करणे.
  14. आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन नागरिकांसाठी सोयीसुविधा नियोजित करणे / पुरविणे.
  15. शहराच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि करमणुकीविषयी गरजा लक्षात घेऊन त्यासंबंधीचे नियोजन / तजवीज करणे.
  16. जनतेच्या / नागरिकांच्या हितसंरक्षणासाठी माहितीच्या अधिकाराची काटेकोरपणे अंमलबजावणी

अधिक माहितीसाठी सिडकोच्या https://cidco.maharashtra.gov.in/ संकेतस्थळाला भेट द्यावी.